Tuesday, 17 March 2015

आज पासून १ले अखिल भारतीय मराठी युवा साहित्य संमेलन पुण्यातील एस. एम. जोशी सभागृहात सुरु झाले आहे. आज कुणाल  गायकवाड ( संपादक - "सुंबरान  ") यांचे विचार ऐकण्याचा योग आला . "लय भारी" असंच म्हणावं लागेल . "आजचे साहित्य व माध्यमे तरुणाईची भाषा बोलतात का?" या परिसंवादात तो आपले विचार मांडत होता . आजच्या माध्यमांचे केंद्रीयीकरण झाले आहे., माध्यमांमुळे विचारांचे सपाटीकरण झाले आहे. तरुणांचे असे वेगळे प्रश्न असतात त्यावर रिपोर्ताज केले जात नाहीत.  हिंदी मधील समांतर माध्यमांप्रमाणे अन्य भारतीय भाषांत समांतर माध्यमे नाहीत  अशी खंत त्याने व्यक्त केली .  . 
' भाषा म्हणजे जगण्याची पद्धत , भाषेत शब्द- ध्वनी असतात तसेच शांतताही  असते " अशी सुरुवात करून युवा चित्रपट दिग्दर्शक अक्षय इण्डिकर याने  सिनेमा माध्यम या शांततेचा विचार करते काय ? असा प्रश्न उपस्थित करून मराठी सिनेमाला लागलेल्या व्याधींबाबत मुद्दे मांडले . तरुणाई साठी चित्रपट निघतात पण विचार करणाऱ्या तरुणांवर  चित्रपट होत नाही आणि आताच्या तरुण पिढीचे प्रश्न काय आहेत  याचा विचार होताना दिसत नाही असे विचार मांडले . 
प्राध्यापक केदार काळवणे यांनी आजचे साहित्य व आजची तरुणाई याविषयीची निरीक्षणे मांडली . आजचे साहित्य म्हणजे १९९०-९१ नंतरचे . जागतीकीकरणाचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला . आजची तरुणाई गोंधळलेली, कोलमडलेली आहे. बेकारी , व्यसनाधीनता , जात - धर्म, नक्षलवाद, दहशतवाद यांनी संभ्रमित झालेली आहे . त्याचे चित्रण आजच्या साहित्यात येते परंतु ते समग्र पणे  येत नाही अशी मांडणी करत वेगवेगळ्या साहित्य कृतींची उदाहरणे दिली .  आजच्या साहित्यात तरुणाई पुरेशाप्रमाणात व्यक्त होत नाही , आजची तरुणाई लिहिते परंतु त्यात परिपक्वता व दृष्टीकोनाची कमतरता आहे. नव्वद नंतर  'कोसला" च्या उंचीची कादंबरी झाली नाही तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अजून साहित्यात आल्या नाहीत याची कारणे साठोत्तरी साहित्य चळवळी  नव्वदी नंतर थांबल्या- संपल्या आणि आजचा तरुण सखोल वाचन , चिंतन करत नाही ही असल्याचे त्यांनी नमूद केले. 

परिसंवादाचे  अध्यक्ष संजय आवटे ( रोव्हिंग एडिटर , सकाळ माध्यम समूह ) यांनी  समारोप केला .  मुख्य प्रवाहातील माध्यमे ही भूल देणारी आहेत .  सध्या तरुणाईला सर्व माध्यमे वश आहेत पण ज्यावेळी माध्यमे वाढतात तेंव्हा विचाराच्या शक्यता आकसतात . सोशल मिडिया मुळे आजचे लेखन हे प्रतिक्रयावादी  झाले आहे. शीघ्र प्रतिक्रिया आल्याने संभाव्य वैचारिक साहित्याच्या शक्यता मरतात .असे असले तरी आजच्या तरुणाईला आपली  भाषा सापडते आहे . आजच्या तरुणाईत नाकरण्याची  , प्रश्न विचारण्याची क्षमता आहे. ही साकारण्याची पूर्व  तयारी आहे  व सृजनशील गोंधळ हा कॉपी - पेस्ट पेक्षा केंव्हाही चांगलाच असे विचार त्यांनी मांडले .    

No comments:

Post a Comment