पुणे , दि . १५ मे ,१५ -
आज टिळक स्मारक मध्ये संध्याकाळी गिरीश कुबेरांचं वसंत व्याख्यानमालेतील व्याख्यान ऐकायला गेलो होतो . विषय - " अच्छे दिन " आले का.? चिकार गर्दी असणार म्हणून लवकर जाऊ म्हणता म्हणता पोहोचायला सव्वा सहा झाले . गेलो ते खालच्या खुर्च्या भरलेल्या . सहासष्ठ पायऱ्या चढून बाल्कनीत गेलो तर बाल्कनी देखील फुल्ल . कशी बशी जागा मिळाली . विशेष म्हणजे कार्यक्रमाला तरुण मुला मुलींची संख्या जास्त होती . (नव्वद टक्क्यांपर्यंत ) . शेजारच्या मुलाने माहिती पुरवली - स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या मुलांची गर्दी आहे.
आपल्या व्याख्यानात कुबेरांनी पाच मुद्दे मांडले . ऊर्जा , रस्ते, शिक्षण , व्यवस्था (सिस्टीम) आणि परदेशी चलनाची गंगाजळी . या मध्ये आपली स्थिती काय आहे ते आकडेवारीनिशी सांगितले . ऊर्जा म्हणजे क्रूड oil बाबत आपण ८३ % आयात करतो . मोदी सत्तेत आल्या नंतर सुदैवाने तेलाचे दर खूप खाली आले. अगदी पंचेचाळीस रुपये प्रती पिंप . त्यामुळे जवळपास दोन लाख कोटी रुपये आयातीत वाचले . त्यामुळे चालू खात्यातील तूट साडे तीन टक्क्यांपर्यंत आली . रस्त्यांच्या बाबत चीनशी तुलना करता आपण खूपच मागे आहोत .आपण वाजपेयी सरकारच्या वेळी जागे झालो आणि "सुवर्ण चतुष्कोन " - या महामार्ग योजनेला सुरुवात झाली . या वर्षी शिक्षणा साठी तरतूद साडे चार टक्के आहे , ती ब्राझील, मेक्सिको पेक्षाही कमी आहे . सरकार कोणत्याही पक्षाचे असो आपली व्यवस्था व्यक्ती केंद्रित आहे. व्यवस्था ही व्यक्ती निरपेक्ष असली पाहिजे .आपली गंगाजळी कमाल पातळी वर पोहोचली त्यात तेलाचे वाचलेले पैसेही आहेत हे विसरून चालणार नाही . चीनची गंगाजळी आपल्या पेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे . या सर्व पार्श्वभूमीवर अच्छे दिन आले का? आपणच विचार केला पाहिजे.
भूमी संपादन आणि जी एस टी बाबत समित्या स्थापन कराव्या लागल्या यात मोदी सरकारचा तांत्रिक पराभवच आहे . मोदी सरकार पुढचे खरे आव्हान मार्च २०१ ६ मध्ये येणाऱ्या सातव्या वेतन आयोगाचे असेल .
व्याख्यानातील सूचक कोपरखळ्यांना श्रोते टाळ्यांनी दाद देत होते . कुबेरांचे भाषण माहितीपूर्ण व विद्वत्तापूर्ण होते पण ओघवते नव्हते . तथापि ते सध्याचे celebrity आणि तरुण - वयस्क सर्वांचे लाडके संपादक आहेत हे निश्चित . (पूर्वी कुमार केतकर होते तसे)
No comments:
Post a Comment